Mumbai Mahalakshmi Race Course: बीएमसीने घेतला महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जमिनीचा ताबा; उभे राहणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क
Mumbai Mahalakshmi Race Course

Mumbai Mahalakshmi Race Course: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अखेर महालक्ष्मी रेस कोर्स (Mahalakshmi Race Course) येथील 120 एकर जागा ताब्यात घेऊन दीर्घकाळ चाललेला वाद संपवला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत असून तो विहित कालावधीत पूर्ण करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर, या मुख्य जमिनीपैकी 120 एकर जागा आता पालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे, तर उर्वरित 91 एकर आरडब्ल्यूआयटीसीने वापरासाठी राखून ठेवली आहे.

मुंबईकरांच्या फायद्यासाठी 120 एकर जागेवर लवकरच सेंट्रल पार्क, उद्यान आणि खुली जागा विकसित केली जाईल. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या एका भागाचे मोठ्या उद्यानात रूपांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावरुन जोरदार वाद निर्माण झाला होता. नागरिक आणि कार्यकर्त्यांसह समीक्षकांनी असा युक्तिवाद केला होता की, या योजनेमुळे भू-विकासकांकडून व्यावसायिक शोषण होण्याचा धोका आहे. मात्र महालक्ष्मी रेसर्कोर्सवर कुठल्याही स्वरुपाचे बांधकाम होणार नाही असे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत विभागाने स्पष्ट केले आहे.

मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना 91 एकर शासकीय भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे 30 वर्षाच्या महत्तम कालावधीसाठी नूतनीकरण करण्यास अटी व शर्तीमह मान्यता देण्यात आली आहे. (हेही वाचा: Most Expensive State in India: गुजरात ठरले भारतातील सर्वात महाग राज्य; जाणून घ्या महाराष्ट्राचे स्थान)

मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. याच्या क्लब स्टेबल्स आणि इतर सरचनांनी व्यापलेल्या बांधीव क्षेत्राकरीता, जमिनीच्या वार्षिक मुल्य दर तक्त्यातील (रेडीरेकनरने येणाऱ्या) किमनांच्या 10% रकमेवर 1% या प्रचलित दराने भाडेपट्टा आकारणी करण्यात यईल. उर्वरित मोकळी जागा अश्व शर्यतीच्या दिवसांव्यतीरिक्त इतर दिवसांकरिता सार्वजनिक वापराकरिता उपलब्ध राहणार असल्याने या जागेवर सवलतीच्या दराने भाडेपट्टा आकारण्यात येणार आहे.