कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) मंदावत असून लसीकरणही सुरु आहे. त्यामुळे मुंबई लोकल (Mumbai Local) सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यातच लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. मात्र यावर दोन दिवसांत निर्णय देऊ, असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नागरिक आशेने निर्णयाची वाट पाहत आहेत. दरम्यान, उद्या कोविड-19 टास्क फोर्सची बैठक होणार असून या बैठकीत मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी होत असल्यामुळे टास्क फोर्सच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निर्बंध शिथिलीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील 2 महिने धोक्याचे असल्याचं मत टाक्स फोर्समधील वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे. मृत्यूचं प्रमाण शुन्यावर आणणं हे लक्ष्य असल्याचंही तज्ञ म्हणाले. तसंच निर्बंध शिथिल केलेल्यांचे परिणाम येत्या दोन आठवड्यांमध्ये लक्षात येतील, असं टाक्स फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं. (Mumbai Local Update: लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी का नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला सवाल)
पुढील 2 महिन्यांत बरेच सण आणि उत्सव असल्याने हा काळ संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक आहे. यापूर्वी निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाली होती. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर लोकल संदर्भात काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसल्याने नियमांचे पालन करणे हिताचे ठरणार आहे.