Mumbai Local Trains | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून लोकल (Local) सेवा बंद आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) मंदावत असताना सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरु होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. "कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरु होणार नाही", असं विजय वडेड्डीवार यांनी म्हटलं आहे. यामुळे सर्वसामान्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी अजून काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

"मुंबई ही राज्याची राजधानी असून गर्दीचं ठिकाण आहे. त्यामुळे कोरोना संपेपर्यंत तरी मुंबईत लोकल सुरु होणार नाही," असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यात कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसून काही जिल्ह्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे. स्वत:हून मृत्यूला आमंत्रण देऊ नये, असे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. (Mumbai Local: मुंबईत सर्वसामान्य लोकलने प्रवास कधी करणार? महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले 'हे' उत्तर)

यापूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा अद्याप सुरु करता येणार नाही, असं म्हटलं होतं. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यास सविस्तर बैठकीनंतरच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या होत्या. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही लोकल इतक्यात सुरू करणे शक्य नसल्याचे म्हटले होते.

दरम्यान, राज्यात 7 जून पासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली. पाच टप्प्यात अनलॉकिंग होत आहे. मात्र 28 जून पर्यंत मुंबई अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात राहणार असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. सध्या मुंबईत रुग्णसंख्येत घट होत असली तरी शहराची रचना, लोकसंख्येचे प्रमाण यामुळे लोकल प्रवास खुला करणे धोक्याचे ठरु शकते. त्यातच तिसऱ्या लाटेचे संभावना तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या एकूण परिस्थितीचा विचार करुन लोकल सेवा अद्याप तरी सुरु करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे दिसून येत आहे.