Mumbai Local Update: मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत
मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस (Mumbai Rain) सुरू असल्याने जागोजागी पाणी साचल्याचं दिसून आलं. त्याचा परिणाम हा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर झाला होता. मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी असून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक (Mumbai Central Line Update) आता पुन्हा सुरू झाली आहे. मध्य रेल्वेवर ठाण्यापासून पुढे पाणी साचल्यामुळे ठप्प झालेली लोकल आता पुन्हा सुरू झाली असून या मार्गावरील स्लो आणि फास्ट, अप आणि डाऊन दिशेने वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. (हेही वाचा - Mumbai Rains: मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरील वाहतूक तासभर ठप्प; 50 उड्डाणे रद्द, 27 मार्ग बदलले)

सध्या पाणी ओसरल्याने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेले पाणी ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. स्लो आणि फास्ट अशा दोन्ही मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सुरू झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, ठाणे ते कर्जत आणि कसारा अशी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील सुरू असून ती थोड्या उशिराने आहे.

चुनाभट्टी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. हार्बर मार्गावरची रेल्वेवाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत हार्बरवरच्या लोकलला ब्रेक लागला होता. यशवंतराव चव्हाण सेंटरपासून कुलाब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. सतत पडलेल्या पावसामुळे नाले तुंबले असल्याने रस्त्यावर पावसाचे पाणी आले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा महाराष्ट्र सरकारचे मोठे प्रशासकीय अधिकारी राहतात.