
मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर 5 तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी 16 फेब्रुवारी दिवशी रेल्वे ने प्रवास करणार्यांनी ब्लॉक च्या वेळा पाहून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा जम्बो ब्लॉक बोरिवली ते गोरेगाव दरम्यान आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 मध्ये देखभाल, दुरूस्तीचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. रिपोर्ट्स नुसार, ट्रक, सिग्नलिंग सिस्टिम आणि ओव्हरहेड इक्विपमेंट चं काम हाती घेण्यात आलं आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक अप आणि डाऊन मार्गावर घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील गाड्या गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहतील. अंधेरी आणि बोरिवलीच्या काही लोकल हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील.
मध्य रेल्वे मार्गावरही ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर CSMT हून सकाळी 10.48 ते दुपारी 3.32 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा CSMT आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबेल आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या डीएन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईकडे सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या यूपी हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.