Mumbai Local (photo credits: Commons.Wikimedia)

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल मार्गावर उद्या (रविवार, 29 ऑगस्ट) दुरुस्ती आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर हा ब्लॉक असणार असून यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. दरम्यान, सध्या लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. तरी देखील वेळापत्रकातील बदल लक्षात घेऊनच घराबाहेर पडणे सोयीचे ठरेल. (Mumbai Local Train E-Pass: मुंबई लोकल ट्रेनचा Universal Travel Pass मिळवण्यासाठी epassmsdma.mahait.org वर कसा अर्ज करायचा? येथे मिळवा संपूर्ण माहिती)

ठाणे कल्याण दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. कल्याणकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन्स सकाळी 11 वाजून 43 मिनिटांनंतर मुलुंड नंतर फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. दुपारी 3.46 मिनिटांनंतर या ट्रेन्स पूर्ववत होतील. फास्ट मार्गावर वळवलेल्या या ट्रेन्स ठाणे, दिवा, डोंबिवली या स्थानकांवर थांबतील. या दरम्यान सर्व गाड्या 10 मिनिटे उशीराने धावतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरुन सुटणाऱ्या आणि टर्मिनल्सकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 च्या दरम्यान आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशीराने चालतील.

हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 दरम्यान वाहतूक बंद राहील. सीएसटीएम कडून पनवेल कडे जाणारी ट्रेन 10.03 मिनिटांनी शेवटची असेल. त्यानंतर दुपारी 3.16 मिनिटांनी यापुढील ट्रेन जाईल. यादरम्यान सीएसटीएम ते वाशी दरम्यान एक खास ट्रेन चालवण्यात येईल. परंतु, यादरम्यान बेलापूर-खारकोपर या मार्गावरील सर्व ट्रेन्स आपल्या वेळेनुसार धावतील.

तसेच ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते पनवेल दरम्यानची वाहतुक सकाळी 9.01 मिनिटापासून दुपारी 3.53 पर्यंत बंद राहील. मेगाब्लॉक दरम्यन ठाणे-वाशी आणि ठाणे-नेरुळ ट्रेन्स चालू राहतील.