Mumbai: लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणाऱ्या पार्टनरकडून महिलेची निर्घृण हत्या; आरोपी फरार
Murder (Photo Credit - File Photo)

लिव्ह इन रिलेशनशीप (Live in Relationship) मध्ये राहणाऱ्या पार्टनरकडून महिलेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतून (Mumbai) समोर आला आहे. प्रियकराने ओढणीने गळा आवळून महिलेचा खून केला आणि त्यानंतर आरोपीने तिच्या चेहऱ्यावर धारदार चाकूने वार केले. एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार, सीखा मंडल असं या मृत महिलेचे नाव असून ती 44 वर्षांची होती. वरळीतील मायानगर परिसरात हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. (Live in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या)

शिबू भौमिक असे आरोपीचे नाव असून पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ही महिला त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप राहत होती. दरम्यान, परवा रात्री बारा वाजायच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला आलेल्या कॉलमध्ये एक महिला रक्ताने माखलेल्या बेशूद्ध अवस्थेत सापडली असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं आणि महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मात्र गळा आवळून महिलेचा खून करण्यात आल्याचे तसंच तिच्यावर जड वस्तूने हल्ला केल्याचे डॉक्टरांच्या निर्दशनास आले. इतक्यावरच आरोपी थांबला नव्हता तर त्याने धारदार चाकूने महिलेच्या चेहऱ्यावर वार केले होते. (Live in Relationship: प्रेयसीच्या पैंजणानं फोडली पापाला वाचा, प्रियकर गजाआड; नालासोपारा येथील घटना)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या एक दिवस आधीच शिबू भौमिक तिथून बाहेर गेला आणि त्यानंतरच हत्येची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा प्रियकर शिबू भौमिक विरोधात आयपीसीच्या कलम 302 गुन्हा दाखल केला आहे. शिबू भौमिक हा वरळीमध्ये बांधकाम सुरु असलेल्या टोलेजंग इमारतीत सुतारकाम करतो. सध्या तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.