स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये; मुंबई उच्च न्यायालयाची सूचना
Mumbai High Court | (Photo Credit: ANI)

कोरोना बाधितांचे वाढते आकडे आणि मृतांची संख्या यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. यातच एकच वेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. अशा अनेक घटना राज्यातील विविध जिल्हांमधून समोर आल्या. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) या परिस्थितीची दखल घेत सूचना जारी केल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. एबीपी माझा ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

त्याचबरोबर राज्यातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची आणि शवगृहांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान, कोविड-19 काळात उद्भवलेल्या समस्यांबाबत हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

कोरोना मृतांच्या वाढत्या आकड्यामुळे सध्या राज्यातील उपलब्ध व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक मृतांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. यापूर्वी बीड तसंच राज्याच्या विविध भागांतून अशा घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, ही परिस्थिती लक्षात घेऊन पुण्यात स्मशानभूमी चोविस तास चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Coronavirus In Beed: एकाच चितेवर आठ कोरोना रुग्णांचे अंत्यसंस्कार, बीड जिल्हयातील COVID 19 स्थिती)

राज्यातील कोविड-19 चे संकट, अपुऱ्या आरोग्य सुविधा यामुळे परिस्थिती गंभीर होत असताना या मुद्द्यांवरुन राज्य आणि केंद्र सररकारमध्ये वाद होत आहेत. दरम्यान, देशातील कोरोना लसींच्या वेगवेगळ्या किंमतीवरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. तसंच याबाबतचे स्पष्टीकरण देण्याचा आदेशही केंद्र सरकारला दिला आहे.