राज्यातील कोरोना व्हायसस (Coronavirus) संक्रमण स्थिती भयावहतेकडून भीषणतेकडे निघाल्याची चिन्हे आहेत. एका बाजूला लसीकरण मर्यादीत प्रमाणात होत आहे. दुसऱ्या बाजूला नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. कोरोना नियम पाळत नाहीत. परिणामी राज्यातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणवर वाढत आहे. इतका की काही ठिकाणी रुग्णालयात रुग्णांना बेड तर कमी पडू लागले आहेतच. परंतू, कोरोनामुळे (COVID 19) मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कारही एकाच चितेवर करावे लागण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यातील (Beed District) अंबाजोगाई (Ambajogai) येथे आठ कोरोना रुग्णांना ( Corona Patients ) एकाच चितेवर अंत्यसंस्थाकर करावे लागले. अंबाजोगाई नगरपालिका प्रशासनाकडून कोरोनाबाधीत आठ मृतदेहांचे अंत्यसंस्कार एकाच चितेवर करण्यात आले. आठ महिन्यापूर्वीही (6 सप्टेंबर) बीड जिल्ह्यात अशीच घटना पाहायला मिळाली होती.
प्राप्त माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथे कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी कोविड 19 संक्रमित रुग्णांवर उपचार केले जातात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपसून या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. केवळ कोरोना रुग्णवाढच होत नाही तर त्यासोबत कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे त्याच प्रमाणे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणेही कठीण होऊन बसले आहे. (हेही वाचा, Lockdown in Amravati: अमरावती मध्ये लॉकडाऊनची आवश्यकता नाही- पालकमंत्री यशोमती ठाकूर)
बीड जिल्हाच नव्हे तर राज्यभरातही कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाण बरेच कमी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या केवळ कोरना लसीचे 14 लाख डोसच शिल्लख आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने लसीचे डोस वेळेत पुरवले नाहीत तर राज्यातील लसीकरण थांबण्याची शक्यता आहे. यासोबतच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाचे आणखी नवे स्ट्रेन आढळल्याचा संशय व्यक्त केला आहे. या नव्या स्ट्रेनबाबतचे नमुने राष्ट्रीय रोगनिवारण कक्षाला पाठविण्यात आले असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.