Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) मानखुर्द (Mankhurd) येथे लपाछपी (Hide-and-Seek) खेळत असताना एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. रेश्मा खरावी (Reshma Kharavi ) असे मुलीचे नाव आहे. आजीच्या घरी खेळत असताना शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती पुढे येत आहे. लपाछपी खेळताना या मुलीवर राज्य होता. त्यामुळे लपलेल्यांना शोधण्यासाठी तिने सोसायटीतील लिफ्टला असलेल्या उघड्या दरवाजात डोके घातले. दरम्यान, खालून लिफ्ट आली आणि तिच्या डोक्याला धडकून अपघात झाला. या घटनेत रेश्मा हिचा जागीच मृत्यू झाला.

लपाछपी खेळताना अपघात घडून झालेल्या मृत्यूला रेश्माच्या कुटुंबीयांनी सोसाटीच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. सोसायटीची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाच रेश्माच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा दावा तिचे वडील वडील रवी खारवी यांनी केला आहे. सोसायटीतील रहिवासी आणि लहान मुलांच्या जीविताची काळजी लक्षात घेता आणि सुरक्षेबाबत निर्माण होणारे सर्व संभाव्य प्रश्न विचारात घेऊन हाऊसिंग सोसायटीने लिफ्टचे दरवाजे उघडे न ठेवता ते बंद करायला हवे होते, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Lift Accident In Mumbai : लिफ्टमध्ये अडकलेल्या 26 वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू; मुंबईच्या मालाड येथील नामांकीत शाळेतील घटना)

अपघाताची घटना घडताच कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविला. मानखुर्द पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कांबळे यांनी सांगितले की, याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना अटक करण्यात आली आहे. रेश्माचे कुटुंब जवळच्या साठे नगरमध्ये राहते. तिची आजी मानखुर्द येथील हाउसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर राहते. दिवाळीनिमित्त रेश्मा आणि तिचे कुटुंबीय आजीला भेटण्यासाठी मानखूर्दला आले होते.

गेल्या काही आठवड्यांमध्ये, देशभरातील आणि जगभरातील अनेक शहरांमधून लिफ्टशी जोडलेल्या अपघातांच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यातील काही मुंबई शहरातच घडल्या आहे. दक्षिण मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये (Saint George’s Hospital) कोविड-19 ड्यूटीवर कार्यरत असलेली 45 वर्षीय महिला कर्मचारी लिफ्टमध्ये मृत अवस्थेत आढळली होती. ही घटना 27 मे 2020 (बुधवार) रोजी घडली होती. अणखी एक अशीच घटना मुंबई शरहारीतल एका नामांकीत शाळेत घडला होता. या शाळेतील जेनेली फर्नांडिस नामक 26 वर्षीय महिला शिक्षकाचा लिफ्ट अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना सप्टेंबर 2022 मध्ये घडली होती. या घटनांमुळे पुन्हा एकदा विविध इमारती आणि शाळांमधील लिफ्ट, त्याचा वापर, सुरक्षा आणि देखभाल यांसारखे अनेक प्रश्न पुन्हा एकदा नव्याने चर्चेला आले आहेत.