मुंबईतील मुसळधार पावसाचा जोरदार फटका मध्य रेल्वे वाहतूक (Mumbai Central Railway Services) सेवेला बसला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे च्या कसारा (Kasara) ते आसनगाव (Asangaon Railway Station) दरम्यान तब्बल 5 ते 6 दीर्घ पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या (Express Trains) खोळंबल्या आहेत. यात पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आदी एक्सप्रेसचाही समावेश आहे.
दरम्यान, ठाणे रेल्वे स्ठानकात एका महिलेने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास खोळंबली. त्यातच पुन्हा मुसळधार पाऊस कोसळल्याने त्यात भर पडली आणि ही वाहतूक सेवा पुरती कोलमडली. प्राप्त माहितीनुसार असवली स्टेशनवर पाणी आहे. रेल्वे मार्गावर इतरही अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या आणि बाहेरुन मुंबईत येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांची कोंडी झाली आहे. (हेही वाचा, मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत; इंटरसिटी एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा)
संध्याकाळची वेळ म्हणजे कार्यालय, व्यवसाय आणि इतर कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकर चाकरमाण्यांची घरी परतण्याची महत्त्वाची वेळ. त्यामुळे सायंकाळी साधारण सहा ते रात्री 12 वाजेपर्यंत रेल्वे फलाटांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. अशा वेळी जर वाहतूक कोलमडली तर, प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.