Mumbai Water Cut: मुंबई तलावक्षेत्रात पाणीसाठा वाढल्याने 21 ऑगस्टपासून 10% पाणीकपात; 85% जलसाठा उपलब्ध
पाणी कपात Photo credit: Wiki Commons

Mumbai Water Supply Cut Updates:  मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरण आणि तलावक्षेत्रामध्ये ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस बरसल्याने आता मुंबईकरांवरील पाणीकपात 20% वरून 10% करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने केला आहे. दरम्यान 21 ऑगस्टपासून आता मुंबई शहर आणि बीएमसी (BMC)  कडून पाणीपुरवठा होणार्‍या ठाणे (Thane), भिवंडी महानगरपालिका (Bhivandi) आणि आजुबाजूच्या गावांनादेखील दिलासा मिळणार आहे. Modak Sagar: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव पूर्ण क्षमतेने भरला, वैतरणा धरणाचे 2 दरवाजे उघडले

मुंबईमध्ये यंदा धरणक्षेत्रात जुलै अखेरीपर्यंत पुरेसा पाऊस बरसत नसल्याने 5 ऑगस्ट पासून 20% पाणीकपात लागू केली होती. परंतू काल (19 ऑगस्ट) पर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या साठ्यात वाढ झाली आहे. सध्या या पाणलोटक्षेत्रात मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी 85% साठा असल्याने पालिकेने आता पाणी कपात कमी केली आहे.

दरम्यान पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी याच दिवसापर्यंत मुंबईच्या पाणीसाठ्यात 94.28% जलसाठा होता. 2018 साली 91.83% जलसाठा होता.

मुंबईला सात तलावांच्या माध्यामातून पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी आता विहार, तुलसी आणि मोडक ही तलावं पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. अन्य चार तलावांमध्येही मागील काही दिवसांत दमदार पाऊस झाल्याने आता मुंबईसमोरील पाण्याचे संकट काही अंशी कमी झाले आहे. 22  ऑगस्ट पासून राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मोठा दिलासादायक निर्णय बीएमसीने जाहीर केला आहे.