Mumbai: डिलिव्हरी बॉयला मारहाण,समतानगर परिसरातील शिवसेना शाखाप्रमुखासह इतरांवर गुन्हा
Delivery Boy |

मुंबई (Mumbai) येथील समतानगर (Samtanagar) परिसरात शिवसैनिकांकडून एका अॅमेझॉन कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला (Amazon Delivery Boy) गंभीर मारहाण झाल्याची घटना पुढे येत आहे. राहुल शर्मा असे डिलीव्हरी बॉयचे नाव असून मारहाणीत त्याच्या डोक्याला 6 टाके पडल्याची माहिती आहे. या प्रकरणात स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख आणि इतर काही शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित डिलिव्हरी बॉयने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. समतानगर परिसरात या आधीही शिवसैनिकांकडून एका माजी सैनिकाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा समतानगर येथील शिवसैनिक चर्चेत आले आहेत.

प्राप्त माहितीनुसा, कांदीवली येथील पूर्व पोइसर परिसरात राहणारा तक्रारकर्ता राहुल शर्मा (डिलीव्हरी बॉय) हा मंगळवारी (27 जुलै) आपली ऑर्डर घेऊन निघाला होता. रस्त्यातच पाऊस आल्याने त्याने शिवाजी मैदान येथील शिवसेना शाखेबाहेरच्या छताखाली आश्रय घेतला. या वेळी चंद्रकांत निनावे याने त्याच्या राहुलच्या ऑर्डरच्या सामनावर पाय दिला. त्यामुळे राहुलने चंद्रकांत यांना टोकले. या वेळी चंद्रकांत आणि त्यांच्यासोबतच्या इतर शिवसैनिकांनी राहुल याला बेदम मारहाण केली. (हेही वाचा, Coronavirus: लॉकडाउन असताना घराबाहेर पडला, सख्ख्या भावाने भावाचा मुडदा पाडला, मुंबई येथील धक्कादायक घटना)

दरम्यान, या घटनेनंतर राहुल शर्मा याने परिचीत आणि कार्यालयातील सहकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. तसेच, प्रकरण सामंजस्याने मिटवण्याचा सल्ला दिला. परंतू, तक्रारदार तक्रार देण्यावरच अडून राहिल्याने पोलिसांचा नाईलाज झाला. शेवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी काही शिसैनिकांना अटक केल्याचीही माहिती आहे.

हवामान विभागाने मुंबईत हलक्यात ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. पावसाळा असल्याने मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊन निर्बंधांमुळे आगोदरच हैराण असलेल्या मुंबईकर, व्यवसायिक, डिलिव्हरी बॉय आणि इतरांना पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागतो आहे.