Coronavirus: लॉकडाउन असताना घराबाहेर पडला, सख्ख्या भावाने भावाचा मुडदा पाडला, मुंबई येथील धक्कादायक घटना
Kills | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन (Lockdown) आहे. मुंबई Mumbai) शहरही बंद आहे. कोणत्याही नागरिकाला अत्यावश्यक सेवा, कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई आहे. असे असताना घराबाहेर पडला म्हणून सख्ख्या भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबई (Mumbai) शहरात घडली आहे. कांदिवली (Kandivali) येथील समता नगर पोलीस स्टेशन ( Samta Nagar Police Station) अंतर्गत हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राजेश ठाकूर असे आरोपीचे नाव आहे. कांदिवली येथील समता नगर पोलिसांनी आरोपीला राहत्या घरुन अटक केले आहे. पोलिसांनी सांगितले की, दुर्गेश ठाकूर असे त्याच्या भावाचे नाव आहे. तो पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनीला सुट्टी आहे. त्यामुळे तो मुंबईला आला होता. दरम्यान, लॉकडाऊन झाल्याने घराबाहेर पडण्यास बंदी होती. अशा स्थितीत दुर्गेश घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला घराबाहेर जाऊ नको असे सांगितले. त्याला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. तरीही तो घराबाहेर पडला. (हेही वाचा, मुंबई: घाटकोपर येथील पंतनगर परिसरात कोरोना व्हायरसग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर BMC कडून परिसराचे निर्जंतुकीकरण)

पुढे बोलताना पोलिसांनी सांगितले की, घराबाहेर पडलेला दुर्गेश थोड्या वेळाने घरी परतला. या वेळी आरोपी राजेश आणि त्याच्या बायकोने दुर्गेश याच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला किरकोळ वादातून सुरुवात झालेला वाद विकोपाला गेला. आरोपीने धारधार शस्त्राने दुर्गेश याच्यावर सपासप वार केले. दुर्गेश याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, घाव वर्मी लागल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.