fraud | (File image)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून 27 जणांची 2 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने गेल्या शुक्रवारी ही माहिती दिली. ऐरोली येथील संदीप चव्हाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या आरबीआयमध्ये सुरक्षा रक्षक असलेला माजी सैनिक, 41 वर्षीय सदानंद भोसले याने पीडितांना आरबीआयमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांची फसवणूक केली.

भोसले याने सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत पिडीत लोकांकडून 2.24 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. पीडितांना आश्वासनानुसार नोकऱ्या मिळाल्या नाहीत किंवा त्यांचे पैसेही परत मिळाले नाहीत. चव्हाण यांनी फसवणूक झालेल्या इतर 26 जणांची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एकत्रितपणे पोलिसांत गुन्हा दाखल केला असून भोसलेचा शोध सुरू केला आहे.

सर्व पीडितांनी दिलेल्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी गुरुवारी भोसले याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेच्या तिसऱ्या तुकडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. आरोपींच्या चौकशीत आणखी अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात.

(हेही वाचा: Death Threat to Eknath Khadse: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी; दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आले फोन)

दरम्यान, रोजगाराच्या नावाखाली तरुणांची फसवणूक होण्याची ही देशातील पहिलीच घटना नाही. अशी प्रकरणे रोज उघडकीस येत आहेत. छत्तीसगडमधील भिलाईमध्ये सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याची घटना नुकतीच पुन्हा एकदा समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरी देण्याच्या नावाखाली आरोपींनी 10 लाखांची फसवणूक केली आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.