देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये एसी लोकल ट्रेन (Mumbai AC Local Train) सेवेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने (WR) ऑक्टोबरपासून आणखी 31 एसी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, पश्चिम रेल्वे चर्चगेट-विरार दरम्यान त्याच्या उपनगरीय विभागात 48 एसी सेवा चालवते. प्रस्तावित 31 एसी सेवांबाबत, पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या सेवांसाठी वेळापत्रक निश्चित केले जात आहे. त्यापैकी काही नवीन आहेत आणि काही सध्याच्या नॉन-एसी सेवांची जागा घेत आहेत. त्यामुळे उपनगरीय सेवांची एकूण संख्या 1,383 असेल.
सध्या पश्चिम रेल्वे आठवड्याच्या दिवशी 1,375 उपनगरीय सेवा चालवते. पश्चिम रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2022 मध्ये दररोज सरासरी प्रवाशांची संख्या 56, 333 होती, जी 22 सप्टेंबरपर्यंत 71 हजारांवर पोहोचली आहे. त्याचवेळी, प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, आता एसी लोकल ट्रेनमध्ये विशेषतः गर्दीच्या वेळी जागा मिळणे कठीण होऊ लागले आहे. गर्दीच्या वेळेत बहुतांश एसी गाड्या फुल्ल धावत आहेत.
याआधी गुरुवारी प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसी लोकलचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडिओ बुधवारी संध्याकाळी एका प्रवाशाने शूट केला होता. व्हिडिओमध्ये अनेक प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसी लोकलमधील प्रवाशांच्या वाढत्या संख्येचे विश्लेषण करून एसी सेवा सुरू करण्याचा निर्णय काही आठवड्यांपूर्वी घेण्यात आला होता. (हेही वाचा: BEST Dussehra Offer: मुंबईकरांसाठी बेस्टची खास दसरा ऑफर; प्रवासी 19 रुपयांत करू शकता 10 बसफेऱ्या; 'असा' घ्या लाभ)
दरम्यान, याआधी महाराष्ट्रातील वातानुकूलि उपनगरीय ट्रेनमधील प्रवाशांची संख्या गेल्या सहा महिन्यांत सात पटीने वाढली आहे. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवरून सर्वाधिक लोकांनी प्रवास केला आहे. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. मध्य रेल्वेच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रवाशांची संख्या दररोज 5,939 वरून ऑगस्टमध्ये 41,333 प्रतिदिन झाली आहे.