Mumbai: लोखंडी रॉडने वार करत सुरक्षा रक्षकांकडून अल्पवयीन मुलाची हत्या; आरोपींना अटक
Crime | (Photo Credits: PixaBay)

मुंबईतील (Mumbai) पवई (Pawai) येथे एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. मेट्रो (Metro) बांधकामाच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांनी (Security Guards) चोरीच्या संशयावरुन एका 17 वर्षीय मुलाची हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, मुलगा चोरी करण्यासाठी आल्याचा संशय आल्याने चार सुरक्षा रक्षकांनी त्याच्यावर लोखंडी रॉड आणि बांबूने हल्ला केला. यात मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (30 मार्च) घडली असून चारही सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आज (1 एप्रिल) त्यांना न्यायालयापुढे सादर करण्यात येईल. (धक्कादायक! हिंगोलीत एका माथेफिरूने आजीसह मावशीची केली कु-हाडीने वार करुन केली हत्या)

अंकीत बनसोडे असे मृत मुलाचे नाव असून मेट्रो पॅनलमधून पाईप चोरत असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला पाहिले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी  त्याला जबर मारहाण केली. मुलाने तेथून पळ काढत घर गाठले. पण घरी पोहचताच तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. (Sangli: लग्नाला नकार दिला म्हणून पोटच्या मुलीची निघृण हत्या; पित्याला अटक)

रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या  शवविच्छेदन अहवालाच्या आधारे खुनाचा गुन्हा  दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. अवघ्या 5 तासांत आम्ही या हत्येचा छडा लावला. पोलिसांचे नेटवर्क आणि टेक्निकल पुराव्यांच्या आधारे सुरक्षा रक्षकांनी लोखंडी रॉड आणि बांबूने मुलाला मारहाण केल्याचे उघड झाले, असे सिनियर इन्स्पेक्टर आबुराव सोनवणे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.