कोविड सेंटरमध्येच साजरा केला 100 वा वाढदिवस (Photo Credit BMC)

सध्या देशभरात कोरोना विषाणू (Coronavirus) लसीकरण मोहीम जोरदार सुरु आहे. 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या या महिमेचा सध्या दुसरा टप्पा चालू आहे. बीएमसीदेखील (BMC) व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवत आहे. आज मुंबईमध्ये (Mumbai) प्रभावती खेडकर नावाच्या आजींनी कोरोनाची लस घेतली. महत्वाचे म्हणजे या आजीबाईंचा आज 100 वा वाढदिवस होता. या निमित्ताने कोरोना लस घेतल्यानंतर आजीबाईंचा 100 वा वाढदिवस कोविड केअर सेंटरमध्ये साजरा करण्यात आला. बीएमसीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

बीएमसीने म्हटले आहे, ‘एक आरोग्यमय साजरीकरण! प्रभावती खेडकर नामक आजींनी त्यांचा 100 वा वाढदिवस बीकेसी कोविड हॉस्पिटल येथे कोरोनाची लस घेऊन साजरा केला. त्यांच्या आनंदात सहभागी होता आले याचे आंम्हाला समाधान आहे. यापुढेही त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी कामना आम्ही करतो.’ याबाबत मुंबई महापालिकेने आजीबाईंचा केक कापतानाचा फोटो ट्विट केला आहे.

करोना लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका केंद्रांव्यतिरिक्त आता भारत सरकारने जाहीर केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या 29 अतिरिक्त खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. सध्या मुंबईमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले असले, तरी त्याचा वेग वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. लशींच्या उपलब्धतेनुसार पालिका दोन शिफ्टमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याचा विचार करत आहे. (हेही वाचा: मुंबई मध्ये अनेक ठिकाणी कोविड 19 चे नियम धाब्यावर बसवत पब्स रात्री उशिरापर्यंत सुरूच)

दरम्यान, मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 1188 रुग्णांची नोंद झाली आहे, यासह एकूण रुग्णसंख्या 332204 झाली. आज 1253 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 309431 रुग्ण बरे झाले आहेत. आज 5 रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली असून, आतापर्यंत 11,495 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 10398 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.