मुंबई: 10 वर्षीय मुलीवर नराधमाकडून बलात्कार, विद्याविहार स्थानकात मृतावस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ
Representative Image | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून दिवसेंदिवस गैरप्रकार होणे थांबत नाही आहे. त्यात आता अजून एक भर पडली असून चक्क 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित मुलगी 5 नोव्हेंबर पासून बेपत्ता होती. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असता ती त्यांना 9 नोव्हेंबरला विद्याविहार रेल्वे स्थानकात मृत अवस्थेत आढळून आली. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली.

पीडित मुलीचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याने मुलीचे अपहरण करत तिच्यावर बलात्कार केल्यानंतर हत्या केली आहे. आरोपीच्या विरोधात पोलिसांनी लैंगिक गुन्हा अंतर्गत कारवाई केली आहे.(पतीची हत्याकरुन प्रियकरासोबत पळून आलेल्या विवाहित महिलेचा मुलीला विष देऊन आत्महत्येचा प्रयत्न)

सदर मुलगी शेजाऱ्यासोबत खेळत असताना राजीव गांधी नगर येथून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली. पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देत असे सांगितले की, मुलगी अजित कुमार राय याच्यासोबत सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास दिसून आल्याचे सीसीटिव्हीत आढळून आले. मात्र मुलगी त्यानंतर घरी आली नसल्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. तरीही मुलगी न सापडल्याने तिच्या घरातील मंडळींनी पोलिसात धाव घेत ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी स्थानिक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता राय हा त्या मुलीली घेऊन जाताना दिसून आला. त्यानंतर 8 नोव्हेंबरला राय भांडूप मधील एका लोकल दुकानातून बाहेर पडत परिसरात फिरत असल्याचे दिसले. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पाहिले असता पकडून धरले. राय याला पकडल्यानंतर त्याच्याजवळ चाकू, फिनाईलची बॉटल आणि ब्रश सापडून आला. या प्रकरणी प्रथम स्थानिकांनी त्याला मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.