Mucormycosis | (Photo Credit: File Photo)

राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकार तीव्रतेने प्रयत्न करत आहे. त्याला काही प्रमाणात यश येऊन कोरोना संक्रमितांची संख्या कमी होण्यासही मदत होते आहे. त्यामुळे कोरोनाचा धोकात तुर्तास तरी कमी होण्यास मदत झाली असली तरी म्यूकरमायकोसीस (Mucormycosis ) म्हणजेच काळी बुरशी (Black Fungus) नावाच्या आजाराने नवे आव्हान निर्माण केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून म्यूकरमायकोसीस संक्रमितांची प्रमाण वाढताना दिसते आहे. प्रामुख्याने हा आजार कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे. पुकट्या पुणे शहरात आतापर्यंत या आजारामुळे सुमारे 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील एकूण आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासन सावध झाले असून संभव्य धोका टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 1257 जणांना म्यूकरमायकोसीस नावाचा आजार झाला आहे. यात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुणे शहर आणि जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 318 जण म्यूकर मायकोसीस आजाराने संक्रमित आहेत. आतापर्यंत या आजाराने पुण्यात 20 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे या आजाराचे प्रमाण आणखी वाढू नये यासाठी राज्यातील रुग्णालयांसाठी सरकारने नवी नियमावली जारी केली आहे, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. (हेही वाचा, Mucormycosis: महाराष्ट्रातील म्युकरमायकोसीस रुग्णांच्या संख्येत वाढ, राजेश टोपे यांचे प्रशासनास निर्देश)

दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही रुग्णालयांना म्यूकरमायकोसीस रुग्णांबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ससून रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आल्याची माहिती आहे. यात 50 ऑक्सीजन बेड आणि जवळपास 10 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. याशिवाय स्वतंत्र शस्त्रक्रिया विभागाचीही उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय कोरोना आणि म्यूकरमायकोसीस रुग्णांसाठी 10 ऑक्सिजन बेड आणि 5 व्हेंटीलेटर बेडही तयार ठेवण्यात आले आहेत.