पावसाच्या जोरदार सरींनी मागील काही दिवसात मुंबई सह कोकणपट्टीतील अनेक भागांना झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या (University Of Mumbai) कार्यक्षेत्रात येणार्या कोकणातील अनेक भागांमध्ये परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. राज्य सरकारच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा शासन आदेश आणि रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार 20 जुलै रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे नवे वेळापत्रक आता जारी करण्यात आले आहे.
कला शाखा, तिसरं वर्ष, सत्र 5च्या रद्द झालेल्या विषयांच्या परीक्षा 26 जुलै दिवशी आयोजित करण्यात आल्या आहेत. तर एमएससी (वित्त) सत्र २, एमएससी व एमएमसी (संशोधन) सत्र २, एमएससी आयटी व सीएस (६० : ४० व ७५ : २५) व एमएससी गणित (८० : २०) सत्र २, एमएससी व एमएमसी (संशोधन) सत्र ३, एमसीए सत्र १, एमए (ऑनर्स) व एम.कॉम (६०:४०) सत्र 4 च्या परीक्षा आता 31 जुलै दिवशी होतील.
बीए च्या पाचव्या सीमेस्टरच्या 26 जुलैच्या परीक्षा 28 जुलै रोजी होणार आहेत. 26 जुलैच्या नियोजित सर्व परीक्षा काही तांत्रिक कारणास्तव आता 28 जुलै रोजी होणार आहेत. मुसळधार पावसामुळे रायगडातील जे विद्यार्थी परीक्षेला मुकले त्यांची पुन्हा परीक्षा 22 जुलैला घेण्यात आली आहे.
परीक्षेच्या तारखेत बदल झाले असले तरीही परिक्षेच्या वेळेमध्ये आणि परीक्षा केंद्रांमध्ये कोणताही बदल नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली आहे.