Shiv Sena | (File Photo)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनावरुन शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास विरोधी पक्षात असलेल्या भाजपची फूस असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. मुखपत्र दैनिक सामना (Dainik Saamana) संपादकीयामध्ये 'विरोधकांना स्वतःला ज्या लढाया लढता येत नाहीत तेथे असे ‘गुणरत्न’ ताब्यात घेऊन त्यांच्या डोक्यात झिंग भरून महाविकास आघाडीच्या विरोधात उभे केले जाते. भाजपाने त्यांच्या नव्या गुणरत्नाचे योग्य प्रकारे पालनपोषण केले व भाजपामधील नवहिंदुत्ववादी पुढारी ठाकरे-पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाविषयी ज्या चिथावणीखोर भाषेचा वापर करतात, त्याच मार्गाचा अवलंब गुणरत्नाने केला,' असा थेट आरोप केला आहे. शिवसेनेच्या या आरोपावर भाजपतून काय याबाबत उत्सुकता आहे.

'भाजपची नवरत्ने व आजचे गुणरत्ने' या मथळ्याखाली लिहीलेल्या लेखात सामनामध्ये म्हटले आहे की, 'देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेला हल्ला धक्कादायक आहे. स्वतःस एस.टी. कर्मचारी म्हणवून घेणारा एक गट पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाकडे पोहोचला. त्या हिंसक आणि मद्यधुंद झुंडीने पवारांच्या घरावर हल्ला केला. महाराष्ट्राच्या राजकीय सलोख्यास, संस्कृतीस काळिमा फासणारे हे कृत्य आहे. मुंबईतील कामगार चळवळीस एक परंपरा आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मुंबईतील कामगार वर्गाचे योगदान मोठे आहे. कामगार चळवळही यामुळे बदनाम झाली आहे. (हेही वाचा, Gunaratna Sadavarte: शरद पवार निवासस्थान हल्ला प्रकरणाचे तीव्र पडसाद; गुणरत्न सदावर्ते यांची सात तास चौकशी, पोलीस दलातही कारवाईचा धडाका)

सामना संपादकीयात पुढे म्हटले आहे की,' राज्यात एस.टी. कामगारांचा संप सुरू आहे. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे ही एक मागणी सोडली तर कामगारांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या. कामगारांना मोठा घसघशीत आर्थिक लाभ मिळाला. कामगारांचे नेते संपकऱ्यांच्यावतीने कोर्टात गेले. तेथेही चपराक मिळाली व ‘‘कामावर हजर व्हा’’ असे न्यायालयानेही बजावले. ९२ हजार एस.टी. कामगारांपैकी बहुसंख्य कामावर रुजू झाले, पण कोणीएक गुणरत्न सदावर्तेच्या चिथावणीमुळे कामगारांचा एक गट आझाद मैदानावर लढण्याच्या गर्जना करीत बसला होता. यापैकी एक ‘झुंड’ शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचली व त्यांनी दगड, चपला वगैरे फेकून हल्ला केला'

भाजपाने नव्या गुणरत्नाचे पालनपोषण केले

गुणरत्न सदावर्ते यांच्या बाबतीत भाजपला जबाबदार धरत शिवसेनेने म्हटले आहे की, 'सदावर्ते हा माणूस अचानक उपटला व त्याला प्रसिद्धीमाध्यमांतून अकारण मोठेपण दिले गेले. सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात विरोधी पक्षाचे योगदान आहे असे स्पष्ट दिसते. विरोधकांना स्वतःला ज्या लढाया लढता येत नाहीत तेथे असे ‘गुणरत्न’ ताब्यात घेऊन त्यांच्या डोक्यात झिंग भरून महाविकास आघाडीच्या विरोधात उभे केले जाते. भाजपाने त्यांच्या नव्या गुणरत्नाचे योग्य प्रकारे पालनपोषण केले व भाजपामधील नवहिंदुत्ववादी पुढारी ठाकरे-पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाविषयी ज्या चिथावणीखोर भाषेचा वापर करतात, त्याच मार्गाचा अवलंब गुणरत्नाने केला'.

वातावरण अधिकाधिक चिघळावे यासाठी प्रयत्न

'शरद पवार यांच्याबाबतीत भाजपाने दत्तक घेतलेल्या नवरत्नांनी सांगली वगैरे भागात जी भाषा वापरली, तोच कित्ता गुणरत्नाने गिरवला. म्हणजे शाळा तीच आहे. गुणरत्नाने एस.टी. कर्मचाऱ्यांसमोर अनेकदा चिथावणीची भाषणे केली व पवारांच्या घरात घुसून जाब विचारण्याचे आव्हान दिले. कामगारांचे प्रश्न सुटावेत असे सरकारला वाटत होते, पण भाजपा व त्यांच्या गुणरत्नांना तसे वाटत नसावे. वातावरण अधिकाधिक चिघळावे यासाठीच प्रयत्न केले गेले', असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे.