MPSC Mains Exam 2020 Date: एमपीएससी मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर, सविस्तर माहिती घ्या जाणून
MPSC logo (Photo Credits: Website)

MPSC Mains Exam 2020 Date: एमपीएससी पूर्व परीक्षा 2020 चा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. यात 3 हजार 214 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली होती. यातच एमपीएससी मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 4, 5 आणि 6 डिसेंबर 2021 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. सहा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावे, असे देखील कळवण्यात आले आहे.

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत एमपीएससी आयोगाने या परीक्षांबाबत स्वतंत्र परिपत्रक काढले. याबाबत आयोगाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 4,5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल.  हे देखील वाचा- Maharashtra ZP Election 2021: राज्यातील 5 जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

तसेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 18 डिसेंबर, 2021 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावे. याशिवाय, सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 च्या अर्जातील तपशील हा पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये उमेदवारांनी सादर केल्याप्रमाणेच आहे. नवीन संकेतस्थळावर खाते अद्ययावत केले असले तरी, त्यामुळे अर्जातील तपशील अद्ययावत होणे अपेक्षित नाही.

तसेच, जुन्या संकेतस्थळावरील अर्जाचा तपशील घेताना काही तांत्रिक समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारे अर्ज सादर करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या सुविधा केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक तसेच support-online@mpsc.gov.in अथवा आयोगाच्या कार्यालयाच्या contact-secretary@mpsc.gov.in या ईमेल वर संपर्क साधावा.