Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्का आणखी वाढला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर येत्या 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या दाम्पत्याला पुढचे आणखी काही काळ तुरुंगातच राहावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान मातोश्री (Matoshree) बाहेरच हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा हट्ट राणा दाम्पत्याला चांगलाच भोवला आहे. या प्रकरणात त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली. दरम्यान, त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यास मुंबईतील वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर राणा दाम्पत्याचे वकील रिजवान मर्चंट यांनी जामीनासाठी न्यायालयाकडे दाद मागितली. तसेच, राण यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशीही मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. मात्र, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर आक्षेप घेत विरोध नोंदवला. (हेही वाचा, Hanuman Chalisa Row: राणा दांपत्यावर CM Uddhav Thackeray यांची कडाडून टीका; म्हणाले- 'दादागिरी कशी मोडायची आम्हाला शिकवले आहे')

राणा यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेताना केलेल्या युक्तिवादात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले की, आरोपींनी वांद्रे न्यायालयात जामीनासाठी एकदा अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल करण्याची आवश्यकताच काय आहे? या युक्तिवादावर येत्या 29 तारखेला आपले म्हणने सविस्तर मांडावे, असे आदेश न्यायालयाने राणा यांच्या वकिलांना दिले.

दरम्यान, अटक झाल्यानंतर आपल्यासोबत कारागृहात दुर्व्यवहार होत असल्याचा आरोप खासदार रवनीत राणा यांनी केला आहे. त्यांनी याबाबत एक पत्र लोकसभा अध्यक्षांनाही लिहीले आहे. या सर्व घडामोडीनंतर भाजप काहीसा आक्रमक झाला आहे. भाजपने नवनीत राणा यांची पाठराखण करत त्यांच्यावर होणारा कथीत दुर्व्यवहार चुकीचा असल्याचे म्हटले आहे. भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahastrabuddhe) यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला याबाबत एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात नवनीत राणा यांच्यावर होत असलेल्या दुर्व्यवहाराची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्यात यावी असे सहस्त्रबुद्धे यांनी म्हटले आहे.