Hanuman Chalisa Row: राणा दांपत्यावर CM Uddhav Thackeray यांची कडाडून टीका; म्हणाले- 'दादागिरी कशी मोडायची आम्हाला शिकवले आहे'
CM Uddhav Thackeray | Photo Credits: twitter)

महाराष्ट्रात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणाबाबतचा वाद शांत होताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते महाविकास आघाडी व मुख्यत्वे शिवसेनेवर टीका करत आहेत. आज नवनीत राणा व रवी राणा यांची एफआयआर रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. अशात आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे. हनुमान चालीसा वाचायची असेल तर घरी येऊन वाचा, असे त्यांनी सांगितले आहे. ‘हे कृत्य करण्याचा एक मार्ग आहे, परंतु दादागिरी करत येऊ नका. असे केले तर दादागिरी कशी मोडायची हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांचा चांगलाच समाचार घेतला. टीकेचे भोंगे वाजवणाऱ्यांना मी काडीची किंमत देत नाही असे ते यावेळी म्हणाले. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हिंदुत्व शिकवले आहे. ते म्हणायचे मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, सिमेवर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे.’

ते पुढे म्हणाले, ‘हे कुठून आले घंटाधारी हिंदुत्वावादी. घंटाधारी हिंदुत्वावाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आमचे हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. जिकडे हनुमान चालीसा म्हणायची तिकडे म्हणा. भीम रुपी महारुद्र काय असते, ते अंगावर आले तर शिवसैनिक दाखवतील. आमचे हिंदुत्व हनुमानाच्या गदेसारखी आहे.’ (हेही वाचा: 'लोकांना आपल्या धार्मिक भावना सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्याची गरज नाही'; हनुमान चालिसाच्या पठणावरून Sharad Pawar यांची टीका)

ते म्हणाले, ‘हनुमान चालीसा बोलण्याची तुमच्या घरात पद्धत नसेल, संस्कृती नसेल तर आमच्या घरी या. परंतु त्याला एक पद्धत असते. बाळासाहेब होते, मा होत्या तेव्हा आमच्या घरी अनेक साधू-संत यायचे. आमच्या घरी त्यांचे स्वागत व्हायचे. आमच्या घरी जर का तुम्ही दादागिरी करून येणार असाल तर दादागिरी कशी मोडायची तेसुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हिंदुत्वाच्या व्याख्येत समजावून सांगितले आहे.’