राज्यात यंदा पावसाचा जोर अधिक वाढलेला दिसून आला. मात्र अतिमुसळधार पावासामुळे महाराष्ट्रातील विविध भागात पुराची स्थिती निर्माण झाली होती. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार 30 सप्टेंबर पासून मान्सूनचा हंगाम संपतो. तरीही राज्यात पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून राजस्थान आणि 15 ऑक्टोंबर पर्यंत महाराष्ट्रातून मान्सून बाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तर गणशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सवादरम्यान सुद्धा पावसाच्या सरी कोसळणार आहेत. पुढील दोन दिवसात राज्यात हलक्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पावसाचा परतीचा प्रवास साधारण सप्टेंबर महिन्यात सुरु होतो. मात्र यंदा राज्यात पाऊस उशिराने सक्रिया झाल्याने आता परतीच्या प्रवासालासुद्धा उशिर लागणार आहे. महाराष्ट्रासह अन्य ठिकाणी या वर्षात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.(पुणे येथे झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मृतांचा आकडा 23 वर पोहचला, 8 जण अद्याप बेपत्ता)
राज्यात अनुकूल वातावरण असल्याने मान्सून राजस्थान मधील पश्चिम भागात अद्याप सक्रिय आहे. तर पुढील चार दिवस तरी पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातून 15 ऑक्टोंबरनंतरच पाऊस जाणार असल्याचे हवामानशास्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमुपम कश्यपी यांनी म्हटले आहे. त्याचसोबत मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक पाऊस पडणार आहे. तर पुण्यात वातावरण ढगाळ राहणार असून संध्याकाळच्या वेळेस हलक्या सरी कोसळणार आहेत.