यंदा एकापाठोपाठ आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांचा उन्हाळा त्रासदायक गेला. पण एरवीच्या तुलनेत यावर्षी पावसाळा मात्र लवकर सुरू होणार असल्याने सामान्य नागरिक, बच्चे मंडळी, शेतकरी आनंदला आहे. अंदमान निकोबार, केरळ नंतर आता नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास महाराष्ट्राकडे झाला आहे. मोसमी पाऊस अखेर अरबी समुद्रात दाखल झाल्याने आता राज्यात पूर्व मोसमी पावसाची बरसात सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात मागील काही तासांपासून पाऊस बरसत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण यांचा समावेश आहे. या भागात वादळी पाऊस सुरू आहे. फळबागांचे नुकसान झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. नक्की वाचा: Pre-Monsoon Rains: मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, राज्यात अनेक ठिकाणी रस्ते-मंदिरे पाण्याखाली, तलाव तुडूंब , जनजीवन विस्कळीत .
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातून वाहत असलेल्या बाष्पयुक्त वार्यांमुळे पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागराच्या जोडीला अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने कोकणकिनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग येथे वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढला आहे.
सोलापूर शहरासोबत उत्तर आणि दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, सांगोला, महाबळेश्वर, रत्नागिरी, परभणी, लातूर मध्ये पावसाचा जोर वाढल्याने शेतकर्यांच्या फळबागेचं नुकसान झाल्याचेही समोर आले आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांंंना 19 ते 21मे या काळात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.