Haffkine Institute ला लस उत्पादनाची परवानगी मिळताच श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात? 'ठाकरे ब्रँड' म्हणत मनसेचं ट्विट
Raj Thackeray & Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook-PTI)

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे (Coronavirus Second Wave) महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यातच लसींसह आरोग्य सुविधांची कमतरता यामुळे राज्य सरकार समोरील आव्हानं वाढत आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कोव्हॅसिन (Covaxin) उत्पादनासाठी मुंबईतील हापकिन इंस्टीट्यूटला (Haffkine Institute) परवानगी देत राज्याला दिलासा दिला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) या दोघांनी देखील ही मागणी केली होती. त्यामुळे आता श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. 'ठाकरे ब्रँड' म्हणत मनसेनं ट्विट केलं आहे. त्यात राज ठाकरेंच्या पत्रामुळेच ही परवानगी मिळाल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये लिहिले, "हाफकिनला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने जानेवारी महिन्यातच पाठवला होता. मात्र राजसाहेबांचं पत्र गेल्यावर त्याला परवानगी मिळाली. याला म्हणतात ठाकरे ब्रँड." कोरोना काळात राजकारण नको म्हणाणाऱ्यांना आभार मानायला हरकत नव्हती, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. (मोठी बातमी! मुंबईतील हाफकिन संस्थेला कोरोना लस तयार करण्यास केंद्राकडून परवानगी, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार)

संदीप देशपांडे ट्विट:

राज्यातील कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावर उपाययोजनांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत हापकिनला लस उत्पादनाची परवानगी देण्यात आली. यानंतर राज ठाकरे यांनी मोदींचे आभारही मानले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले असून त्यात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. तसंच यापूर्वी हाफकिनला लस उत्पादनाची मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली असून त्यांनी हाफकिनची पाहाणी देखील केली होती.