MNS | Photo Credits: Twitter

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाने आता आगामी निवडणूकांना लक्ष्य ठेवत पुन्हा कामाला जोमाने सुरूवात केली आहे. 9 मार्चला पक्षाचा वर्धापन दिन साजरा झाल्यानंतर 14 मार्चपासून मनसे (MNS) ने राज्यभर सदस्य नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये यंदा कोविड 19 चे संकट पाहता ही सदस्य नोंदणी ऑनलाईन माध्यामातूनही उपलब्ध करण्यात आली होती. मनसेने लोकांना सदस्य नोंदणी साठी बाहेर पडावे लागू नये, अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून क्यू आर कोड जारी केले होते तसेच mnsnondani.com वर सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. मनसेच्या या प्रयत्नाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती मनसेचे नेते, सरचिटणीस शिरीष सावंत यांनी दिली आहे.

लेटेस्टली मराठी सोबत बोलताना शिरिष सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ते 17 मार्च दरम्यान ऑनलाईन माध्यमातून झालेल्या मनसे सदस्य नोंदणी चा आकडा हा अंदाजे साडे तीन लाखांच्या घरामध्ये आहे. अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक मनसे सदस्य नोंदणी अभियानाला प्रतिसाद मुंबई मधून मिळाला आहे. तर अजून पुढील 15 दिवस हे मनसेचे सदस्य नोंदणी अभियान ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहे. राज्यात ऑनलाईन सोबत ऑफलाईन देखील सदस्य नोंदणी सुरू आहे. त्याचा आकडा देखील येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. सुरूवातीला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने ऑनलाईन माध्यमातून सुरू केलेल्या सदस्य नोंदणी मध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या पण आता त्या सार्‍या दूर केल्या आहेत असेही शिरीष सावंत यांनी स्पष्ट केले आहे. MNS Registration: मनसे सदस्य नोंदणी अभियान मध्ये सहभागी होत QR Code स्कॅन करून कसे व्हाल मनसैनिक? Watch Video.

यंदा 9 मार्चला मनसेचा 15 वा वर्धापन दिन साजरा झाला. त्यावेळेस वर्धापनाचा दिनाचा सोहळा रद्द करत राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी खास ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करत संदेश दिला होता. मनसे सदस्य नोंदणी अभियाना दरम्यानही त्यांनी विविध क्षेत्रांतील क्रियाशील, सृजनशील जनांनो राजकारणात या, मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे अशी भावनिक सादही घातली होती.