MNS Registration: मनसे सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात; राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे शुभारंभ
Raj Thackeray & MNS New Flag | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी डिजिटल माध्यमातून नोंदणी अभियान केले जात आहे. यावेळी राज ठाकरे यांनी देखील क्यूआर कोड स्कॅन करुन मनसे सदस्यत्वाची नोंदणी केली. या प्रसंगी राज ठाकरे यांच्या सह पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. MNS Registration:मनसे सदस्य नोंदणी अभियान मध्ये सहभागी होत QR Code स्कॅन करून कसे व्हाल मनसैनिक? Watch Video.

"विविध क्षेत्रांतील क्रियाशील, सृजनशील जनांनो राजकारणात या, मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे! पक्षाची सदस्य नोंदणी सुरु झाली आहे," असा संदेश राज ठाकरे यांनी यावेळी दिला. आगामी पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे बळ वाढवण्याच्या दृष्टीने मनसेने हे पाऊल उचललं आहे.

दरम्यान, मनसे सदस्य नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन नोंदणीसाठी पक्षाच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधावा लागेल. तर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी https://mnsnondani.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्याचबरोबर एक क्यू आरकोड जारी करण्यात आला आहे. तो स्कॅन करुनही तुम्ही मनसेचे सदस्य होऊ शकता. हा क्यू आरकोड तुम्हाला वर्तमानपत्रातील जाहीरातीत, होर्डिंग्स किंवा समाज माध्यमांवर उपलब्ध होईल.

मराठी भाषा दिनानिमित्त मनसे सदस्य नोंदणी अभियान सुरु करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. दरम्यान, आजपासून या अभियानाला राज्यभरात सुरुवात झाली असून 24 एप्रिल पर्यंत नोंदणी प्रक्रीया सुरु राहणार आहे. सदस्यत्वाची नोंदणी केल्यानंतर त्याचं ओळखपत्रं तुम्हाला मोबाईलवर डाऊनलोड करता येणार आहे. विशेष म्हणजे आजच्या पहिल्या दिवशी 3 लाखांहून अधिक जणांनी सदस्यत्वाची नोंदणी केली आहे.