Raj Thackeray & Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook-PTI)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज'वर सामान्य जनता आपल्या समस्या घेऊन जात असते. गेल्या काही काळापासून यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे राजसाहेबांवरचा जनतेचा विश्वास वाढत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. यावरुनच 'अनेक समस्यावंर एकच उपाय' म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी राज्य सरकारवर टोला लगावला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे नवीन मंत्रालय म्हणत त्यांनी चक्क कृष्णकुंजचा पत्ता ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "समस्या अनेक उपाय एक. महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28." (मनसे शॅडो कॅबिनेट वरील शिवसेनेच्या टीकेला संदीप देशपांडे यांच्याकडून प्रत्युत्तर)

संदीप देशपांडे ट्विट:

काही दिवसांपूर्वी वारकरी, कोळी बांधव, मुंबई ठाणे ब्रास बँन्ड असोसिएशनचे लोक यांनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. वारकऱ्यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर पुन्हा सुरु करावे, अशी मागणी केली होती. तर कोळी बांधवांना गावठणाची जमीन मालकीवर दिली जात नाही, ही तक्रार घेऊन कोळी बांधव राज दरबारी दाखल झाले होते. लॉकडाऊनमुळे सण-उत्सव बंद असल्याने ब्रास ब्रँन्ड व्यवसायिक अडचणीत सापडले होते. त्यामुळे सगळीकडे अनलॉक सुरु असताना आमच्यावरच बंदी का असा सवाल ब्रास ब्रँड पथकाने उपस्थित केला होता. ('संजय राऊत एक नंबरचे फेकाडे,' मनसे कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपाला संदीप देशपांडे यांचे उत्तर)

दरम्यान, ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नसताना आता त्यात मनसेची भर पडली आहे. यापूर्वी देखील राज ठाकरे यांच्यावर राज्यपाल भेटीवरुन टीका करणाऱ्या संजय राऊत यांना संदीप देशपांडे यांनी सडेतोड उत्तर दिले होते.