MNS on Gulabrao Patil: गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसे नेते अमेय खोपकर यांच्याकडून प्रत्युत्तर
Ameya Khopkar | (File Image)

गुलाब चक्रीवादळामुळे (Cyclone Gulab) राज्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पुरपरिस्थिती यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यावरुन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला होता. त्यानंतर आता गुलाबरावांच्या या टीकेला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी 'संवेदनाहीन गुलाब' असा उल्लेख करत 'असले नेते मिळाले हेच तर आपलं दुर्दैव असल्याचं' म्हटलं आहे.

अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "गुलाब चक्रीवादळामुळे समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते. राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे. पण संवेदनाहीन गुलाब ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ,असले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे."

अमेय खोपकर ट्विट:

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

राज ठाकरे यांच्या शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीवर पत्रकारांशी बोलत असताना गुलाबराव पाटील म्हणाले की, "राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य आहे, पण मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. मागणी करणं सोपं आहे."

काय होती राज ठाकरे यांची मागणी?

राज्यातील पुरपरिस्थिती पाहता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि प्रत्येक नुकसानग्रस्त घराला-शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत सरकारने तातडीने जाहीर करुन प्रत्यक्षात देण्याची मागणी केली होती.

दरम्यान, यावरुन आता पुन्हा एकदा शिवसेना-मनसे मध्ये टीका टीपण्णीचे राजकारण रंगताना दिसत आहे.