MNS Leader Akhil Chitre Arrested: मनसे नेते अखिल चित्रे यांना अटक; अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप
MNS Leader Akhil Chitre (PC - Facebook)

MNS Leader Akhil Chitre Arrested: मनसे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वांद्रे येथील खैरवाडी विभागातील समाधान सोसायटीमध्ये तयार होणाऱ्या स्पा केंद्राला विरोध केल्याने अखिल चित्रे यांच्यासह 2 जणांना खैरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या इमारतीमधील स्पा सेंटरला नागरिकांचा विरोध आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर दोन गाळ्यांना एकत्र करून एक स्पा केंद्र तयार करण्यात येत आहे. परंतु, यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप सोसायटीमधील नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, गुरुवारी स्पा सेंटरमध्ये वीज जोडणी करण्यास अदानी कंपनीचे कर्मचारी आले होते. त्यावेळी सोसायटीमधील रहिवाशांनी कर्मचाऱ्यांना जोरदार विरोध केला. यावेळी त्याठिकाणी अखिल चित्रेदेखील उपस्थित होते. अखिल चित्रे यांनी स्पा सेंटरसाठी तयार करण्यात आलेल्या गाळ्यातील कर्मचारी संतोष देवलेकर यांना मारहाण करत तोडफोड केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. (वाचा - Shiv Jayanti 2021: 19 फेब्रुवारीला शिव जयंती साधेपणाने साजरी करण्याचं अजित पवार यांचं आवाहन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिवादनासाठी शिवनेरीवर जाणार)

या प्रकरणी अखिल चित्रे आणि इमारतीमधील रहिवासी अमोल भुरके, अजय ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अखिल चित्रे यांनी ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.