MNS Gudi Padwa Rally: मनसे गुढी पाडवा मेळाव्यात शिवाजी पार्क येथून काय बोलणार राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य-फेसबुक)

MNS Gudi Padwa Rally And Raj Thackeray Speech At Shivaji Park: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आज (शनिवार, 6 एप्रिल) मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावरुन जाहीर भाषण करणार आहेत. अलिकडील काळात राज ठाकरे यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. त्याला भाजपकडून तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमिवर राज ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.

पाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा (MNS Gudhi Padwa Rally) शिवाजी पार्कवर घेतला जातो. अपवाद वगळता गेली अनेक वर्षे मनसेने ही परंपरा सुरु ठेवली आहे. दरम्यान, सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. राज ठाकरे यांची मनसे लोकसभा निवडणुकीत सहभागी नाही. मनसेचा एकही उमेदवार लोकसभेसाठी उभा नाही. मात्र, तरीही राज ठाकरे राज्यभरात जाहीर सभा घेणार आहेत.

या आधी झालेल्या मनसेच्या अनेक मेळाव्यांत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप विरुद्ध जाहीर भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांची आक्रमक भाषा आणि तीव्र शब्दांत केलेला हल्ला. यामुळे भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातूनही जोरदार टीका केली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या विरोधात भाजपनेही आपल्या ट्विटर हँडलवरुन अनेकदा व्यंगचित्रं काढत पलटवार केला आहे. (हेही वाचा, ‘कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे, काय होतास तू काय झालास तू!' भाजपा महाराष्ट्र ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका)

दरम्यान, राज ठाकरे यानी या आधी जाहीर भाषणातून मोदींवर केलेल्या टीकेनंतर भाजपने बारामतीचा पोपट अशी राज यांची संभावना केली. त्यालाही ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मनसे भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठींबा देत आहेत, असा त्यांच्यावर आरोप होतो आहे. या सर्व पार्श्वभूमिवर राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.