राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक; विधानसभा निवडणूक रणनिती ठरण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्र निवनिर्माण सेना (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज ठाणे ( Thane) शहरातील टीप टॉप प्लाझा (Tip Top Plaza Thane) येथे पार पडत आहे. मनसेच्या झेंड्याखाली काम करणाऱ्या विविध शखा, संघटना आणि त्यांचे प्रमुख आदी मंडळीशी चर्चा करुन या बैठकीत स्वत: राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते उपस्थिती आहेत.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूक 2019 डोळ्यासमोर ठेऊन या बैठकीत आढावा घेऊन या बैठकीत राज ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून विविध पदाधीकारी काल रात्रीपासूनच ठाणे येथे दाखल झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक कशी लढायची, कोणासोबत युती करायची की स्वबळावर लढायची याबद्दल राज ठाकरे हेच निर्णय घेतील. मात्र, त्यापूर्वी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी कशी तयार करायची. कोणकोणते मुद्दे घ्यायचे याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता राज ठाकरे यांनी भाजपला घाम फोडला होता. लोकसभा निवडणुकीत थेट प्रचाराचे काहीही कारण नसताना राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावत भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या कारभाराचे जाहीर वाभाडे काढले होते. त्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान, ध्वनीचित्रफितींची जोड देत पंतप्रधान मोदी यांची बदलती वक्तवे आणि बदलती भूमिका याबबत असलेला दुटप्पीपणा दाखवून दिला होता. राज ठाकरे यांचा हा झंजावती प्रचार भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळाले होते. (हेही वाचा, Railway Recruitment 2019: मराठी पोरांनो, रेल्वे भरती निघतेय! लक्ष ठेवा, परप्रांतीय घुसतील; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश)

गेले बराच काळ पराभवाच्या छायेत असलेल्या मनसेला लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभांमुळे चांगलीच उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे ही उर्जितावस्था विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवायची. तसेच, कार्यकर्त्यांच्या रुपात लोकांपर्यंत पोहोचत ती मतात परावर्तीक होणार का याबाबत उत्सुकता आहे.