Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. पायाच्या आजारामुळे त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान, या शस्त्रक्रियेपूर्वी केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांच्यावरील नियोजीत शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. कोविड डेड सेलमुळे राज ठाकरे यांना वैद्यकीय भूल (अ‍ॅनेस्थेशिया) देता येणार नाही, असे सांगत डॉक्टरांनी आगोदरच शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, नंतर कोविड-19 चाचणी अहवालही (Raj Thackeray Infected with Coronavirus) पॉझिटीव्ह आला.

पायावरील शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे हे लिलावती रुग्णालयात 24 तास आरोदरच दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी केली. दरम्यान, कोविड डेड सेल्समुळे त्यांना भूल देण्यावर बऱ्याच मर्यादा येत असल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. या वेळी मनसेचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि राज ठाकरे यांचे कुटुंबीय रुग्णालय परिसरात होते. यात बाळ नांदगावकर, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला आणि मुलगा अमत हे देखील उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी पुणे येथील सभेत स्वत:हूनच आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. पाठिमागील काही दिवसांपासून आपल्याला पायाच्या दुखण्याचा त्रास सुरुअसल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांना दोन ते तीन महिने आराम करण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, पायाच्या दुखण्यावरील शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, ही शस्त्रक्रिया पूर्ण करायला त्यांना आता आणखी काही काळ लागू शकतो.  (हेही वाचा, ', राज ठाकरे यांच्यावर रोहित पवार यांचा थेट निशाणा; फेसबुक पोस्ट चर्चेत)

मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे हे जोरदार चर्चेत आले होते. मशिदींवरील भोंग्यावरुन आंदोलन छेडल्यानंतर राज ठाकरे यांनी अयोध्या दौराही जाहीर केला होता. मात्र, परप्रांतियांविरुद्ध आंदोलन सुरु करुन त्यांना केलेल्या मारहणीच्या निशेधार्त उत्तर भारतामध्ये त्यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले. त्यामुळे राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला.