MLA Saroj Ahire (PC - Twitter/ @ians_india)

Maharashtra Budget Session 2023: सोमवारी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (एनसीपी) च्या आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) यांना पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, सरोज अहिरे या आपल्या चार महिन्यांच्या मुलासह विधानसभेत पोहोचल्या. मात्र, बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षातील सोयी-सुविधा पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी या धुळीत माझ्या बाळाला ठेऊ शकत नाही. त्यामुळे मला जावं लागत आहे, अशी खंत सरोज अहिरे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलताना सरोज अहिरे म्हणाल्या की, मी आठ दिवसांपूर्वी प्रधान सचिवांना हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यासाठी पत्र दिलं होतं. आज, हुरूप घेऊन विधानसभेत आले होते. पण, हिरकणी कक्षात कोणतीही व्यवस्था झाली नाही. हिरकणी कक्षात प्रचंड धूळ आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या आजारी बाळाला तिथे ठेऊ शकत नाही. (हेही वाचा -Maharashtra Legislature's Budget Session 2023: 'जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताने महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 ची सुरुवात (Watch Video))

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व कार्यालयांत महिलांसाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करावी, अशी मागणी सरोज अहिरे यांनी केली आहे. नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात आमदार सरोज अहिरे लहान बाळाला घेऊन आल्या होत्या. त्यावेळी तेथे त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात जखमी झालेले भारतीय जनता पक्षाने (भाजपा) आमदार जयकुमार गोर, बजेटच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी वॉकर घेऊन आले होते.