Mira Road Murder Case: 'मीरा रोड हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या'; MP Supriya Sule यांची मागणी
Supriya Sule (PC- PTI)

राजधानी दिल्लीतील श्रद्धा वालकर प्रकरण अजूनही ताजे असताना आर्थिक राजधानी मुंबईमधून (Mumbai) असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मीरा रोड (Mira Road) येथे मनोज साने नावाच्या 56 वर्षीय व्यक्तीने त्याची लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य (32) हिची हत्या करून, तिच्या मृतदेहाचे बारीक तुकडे गेले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विटरवरून या घटनेचा निषेध केला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

माहितीनुसार, आरोपी मनोज आणि सरस्वती अनेक वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. आता मनोजने सरस्वतीची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे बारीक तुकडे केले व ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले. त्यानंतर त्याने ते मिक्सरमध्ये बारीक केले. या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी हे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या जागेत टाकत असे. शेजाऱ्यांना मनोजच्या घरातून दुर्घंधी येऊ लागल्यावर त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली व त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

आता सुप्रिया सुळे म्हणतात, ‘मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत.’ (हेही वाचा: 'महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत'; मुंबईच्या वसतिगृहातील मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येवर MP Supriya Sule यांची प्रतिक्रिया)

त्या पुढे म्हणतात, ‘राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे.’