मीरा-भाईंदर महापालिका महापौर, उपमहापौर निवडणूक: भाजप, महाविकासआघाडी घटक पक्ष शिवसेना - काँग्रेस यांच्यात संघर्ष
Mira-Bhayandar Municipal Corporation Logo | (Photo Credits: mbmc.gov.in)

Mira-Bhayandar Municipal Corporation Mayor, Deputy Mayor Election 2020: मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिका महापौर, उपमहापौर निवडणूक निवडणूक आज (बुधवार, 26 फेब्रुवारी 2020) पार पडत आहे. आज सकळी 11.30 वाजलेपासून महापौर पद निवडणुकीस मतदान होत आहे. एकूण स्थिती पाहता भारतीय जनता पक्षाकडे महापालिकेत स्पष्ट बहूमत आहे. असे असले तरी, शिवसेना, काँग्रेस या महाविकासआघाडीतील घटक पक्षांचे काही (4) नगरसेवक फुटून भाजपकडे गेल्याने भाजपची ताकद अधिक वाढल्याची चर्चा आहे. शिवसेना, काँग्रेसकडून मात्र या चर्चेला दुजोरा मिळू शकला नाही. मात्र, सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने महापौर, उपमहापौर निवडणूकीत काही नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकूण परिस्थिती ध्यानात घेऊन भाजप नेते रवींद्र चव्हण यांनी शहरात पाठीमागील 4 दिवसांपासून मुक्काम ठेवल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, महापौर पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या पदासाठी भाजप विरुद्ध शिवसेना (महाविकाआघाडी) असा सामना रंगत आहे. भाजपकडून जोत्स्ना हसनाळे तर शिवसेनेकडून अनंत शिर्के रिंगणात आहेत. उपमहापौर पदासाठी भाजपचे हसमुख गेहलोत आणि मदन सिंह या दोन उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. अंतिम क्षणी मात्र दोघांपैकी एकाला उमेदवारी मागे घ्यावी लागणार आहे. किंवा भाजपला दोन्ही पैकी एका उमेदवारास अधिकृत म्हणून मान्यता द्यावी लागणार आहे. उपमहापौर पदासाठी काँग्रेस (महाविकाआघाडी) पक्षाकडून मर्लिन डिसा रिंगणात आहेत.

मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिका सभागृहातील पक्षीय बलाबल

भाजप - 61

शिवसेना - 22

काँग्रेस आघाडी - 12

वरील पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजप मजबूत स्थिती असल्याचे दिसते. परंतू, शिवसेना, काँग्रेस पक्षानेही महाविकासआघाडी झाल्यावर बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेत महापौर, उपमहापौर पदावर डोळा ठेवत ते मिळवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे पदासाठी रस्सीखेच होणार हे आता नक्की आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेने आपले नगरसेवक लोनावळा येथे ठेवले होते. तर दुसऱ्या बाजूला भाजपमध्येही जोरदार नाराजी आणि अतंर्गत बंडाळी उफाळून येण्याची शक्यात आहे. त्यामुळे भाजपने आपले नगरसेवक आगोदर गोवा आणि त्यानंतर सीएन रॉक येथे ठेवल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. आपल्या नगरसेवकांचा कोणाशी संपर्क होऊ नये यासाठी त्यांचे मोबाईलही काढून घेण्यात आल्याचे समजते. (हेही वाचा, अश्लिल चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजप माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा राजीनामा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान)

दरम्यान, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांचा उमेदवारीतून पत्ता कापला गेला आहे. त्यामुळे नाराजी असतानाच नरेंद्र मेहता यांची एक समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. नरेंद्र पाटील यांनी भाजपमधील आपल्याकडे असलेल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिका महापौर, उपमहापौर निवडणूकीत काय निकाल लागतो याबाबत उत्सुकता आहे.