Mira-Bhayandar Municipal Corporation Mayor, Deputy Mayor Election 2020: मीरा-भाईंदर महापालिका महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदांवर भाजप उमेदवार निवडून आले. महापौर पदावर जोत्स्ना हसनाळे (Jyotsna Hasnale) तर उपमहापौर पदावर हसमुख गेहलोत विजयी (Hasmukh Gehlot) झाले आहेत. हसनाळे यांनी शिवसेनेच्या अनंत शिर्कें यांचा तर गेहलोत यांनी काँग्रेस पक्षाच्या मर्लिन डीसा यांचा पराभव केला. या निवडणुकीत नगरसेवक फुटण्याचे आणि मतदानाला गैरहजर राहण्याचेही प्रकार घडले. मात्र, असे असले तरी, भाजपने कमळ फुलवत आपली सत्ता कायम राखली आहे. मतदानावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते.
भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे यांना 55 तर, हसमुख गेहलोत यांना 56 मते मिळाली. शिवसेनेच्या अनंत शिर्केंना 31 मते तर, मर्लिन याना 35 मते मिळाली. मीरा भाईंदर महापालिका सभागृहात एकूण 95 नगरसेवक आहेत. पक्षीय बलाबल पाहता त्या नगरसेवकांची संख्या भाजप - 61, शिवसेना - 22, काँग्रेस आघाडी - 12 अशी आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच पालिकेवर भाजपचे वर्चस्व दिसत होते. मात्र, ऐनवेळी काही नगरसेवक मतदानावेळी सभागृहात उपस्थितच राहिले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात 91 नगरसेवकांनीच मतदानात सहभाग नोंदवला. काँग्रेसच्या सारा अक्रम, शिवसेनेच्या अनिता पाटील व दीप्ती भट तर भाजपाचे विजय राय अशी गैरहजर नगरसेवकांची नावे आहेत. (हेही वाचा, मीरा-भाईंदर महापालिका महापौर, उपमहापौर निवडणूक: भाजप, महाविकासआघाडी घटक पक्ष शिवसेना - काँग्रेस यांच्यात संघर्ष)
दरम्यान, महापौर पदासाठी मतदान झाले तेव्हा शिवसेना (20) आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 11 नगरसेवकांनी शिवसेना उमेदवार अनंत शिर्के यांच्या बाजूने मतदान केले. तर, विशेष म्हणजे भाजपाच्या मोरस रोड्रिंक्स, अश्विन कसोदरिया, परशुराम म्हात्रे वैशाली रकवी, यांनी शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे आयत्या वेळी भाजपचे चार नगरसेवक फुटल्याने काही काळ उत्कंटावर्धक स्थिती मतदानादरम्यान निर्माण झाली.