MHADA Mumbai Lottery: मुंबई पोलिसांना म्हाडाची विरार येथे 186 घरे, लवकरच निघणार लॉटरी -सूत्र
HADA Houses | (Photo Credits: mhada)

MHADA Mumbai Lottery: 'स्वत:च्या हक्काचे घर' हे मुंबई पोलिसांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) अर्थातच म्हाडा (MHADA) कोकण महामंडळ हे स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यासाठी विरार येथे 186 सदनिकांसाठी लॉटरी लवकरच काढली जाणार आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. पोलिसांच्या हितास प्राधानन्य देत केंद्र सरकार पंतप्रधान आवास योजना आणि त्यांतर्गत नवी योजना राबवच आहे. या योजनेनुसारच म्हाडा मुंबई पोलिसांना 2022 पर्यंत खासगी मालकीची घरं देणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या घरांच्या किमतीही अधिक स्वस्त असणार असल्याचे समजते. या निमित्ताने मुंबई पोलीस (Mumbai Police) गेली प्रदीर्घ काळा पाहात असलेले गृहस्वप्न पूर्ण होणार आहे.

दरम्यान, 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला स्वत:च्या हक्काचे घर हे केंद्र सरकाचे स्वप्न आहे. या स्वप्नाची पूर्ती होण्यासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील आहे. त्यामुळे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी राज्य सरकार अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्वांना माफक दरात घरं उपलब्ध व्हावीत अशी सरकारची योजना आहे. त्यासाठी मुंबई शहरातील विविध ठिकाणी जागा शोधण्याची जबाबदारी महसूल तसेच सरकारच्या अन्य विभागांसाठी तसेच संबंधीत विभागांवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत आता इतके बांधकाम झाले आहे की, नव्याने बांधकाम करायचे तर आता जागाच शिल्लख नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांसाठी जागांचा शोध ठाणे, रायगड, पालघर, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पनवेल आदी महापालिका हद्दीतही घेतला जात आहे. (हेही वाचा, घरातील स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे व का? जाणून घ्या वास्तुतज्ज्ञ विशाल डोके यांच्याकडून)

गेले प्रदीर्घ काळ पोलिसांनाही किफायतशीर दरात घरे मिळावीत ही मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करुन राज्याच्या गृहमंत्रालयाने एक विशेष प्रस्ताव तयार केला. तो म्हाडाकडे सोपवला. त्यानंतर म्हाडाने पोलिसांना हक्काचे घर मिळावे यासाठी विरार आणि पनवेल आदी महापालिकांमध्ये जागा निश्चीत केली असल्याचे समजते.

दरम्यान, शोधलेल्या जागांवर लवकरच म्हाडा गृहनिर्माण सोसायट्या उभारेन. तसेच, या सोयायट्या पोलिसांसाठी असतील, असे सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात एबीपी माझाने म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांसाठी अंदाजे 2.75 लाख रुपयांचे अनुदान पंतप्रधान आवास योजनेखाली पोलिसांना घर खरेदीसाठी मिळण्याची शक्यता आहे. या अनुदानामुळे पोलिसांना घराच्या किंमतींमध्ये काहीशी सवलत मिळू शकते.