प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : PTI)

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबाद येथे 849 सदनिका आणि 87 भूखंडांची विक्री जाहीर केली आहे. म्हाडाची शाखा असलेल्या औरंगाबाद गृहनिर्माण आणि प्रादेशिक विकास मंडळाने मंगळवारी सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत रिअल इस्टेटचे भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या वर्षापासून म्हाडाचे अधिकारी आणि अर्जदार यांच्यात फक्त ऑनलाइन इंटरफेस असेल. अशा प्रकारे, इच्छुक व्यक्तींनी प्रथम https://housing.mhada.gov.in वर किंवा म्हाडा हाउसिंग लॉटरी सिस्टीम IHLMS 2.0 (MHADA Housing Lottery System IHLMS 2.0.) या मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून नोंदणी करावी लागेल.

नोंदणीनंतर इच्छुक लोक लॉटरी सोडतीत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतील. ही नोंदणी आजीवन वैध असेल, केवळ उपलब्ध लॉटरी सोडती त्यांच्या संबंधित शेवटच्या तारखांना निष्क्रिय होतील. सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 पासून दुपारी 12 ते 10 मार्च 2023 रात्री 11.59 वाजेपर्यंत सादर करता येईल. (हेही वाचा: Holi 2023 Special Buses: होळी निमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी सोडणार विशेष गाड्या)

औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले की, ड्रॉसाठी अॅप आणि वेबसाइटद्वारे नोंदणी आणि अर्ज सादर करणे यासारख्या सर्व प्रक्रिया विनामूल्य आहेत. या अॅपद्वारे नोंदणी, दस्तऐवज अपलोड आणि ऑनलाइन पेमेंट यांसारख्या सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत. सोडतीमध्ये भाग्यवान ठरलेल्या विजयी अर्जदाराला पुढील दोन दिवसांत तात्पुरते पत्र प्राप्त होईल.

म्हाडाच्या सदनिका किंवा भूखंड घेण्याच्या प्रक्रियेमधील नव्या ऑनलाइन प्रणालीमध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाला वाव नाही. त्यामुळे जर कोणी म्हाडाची मालमत्ता उपलब्ध करून देण्याचा दावा करत असेल, तर त्याच्यापासून सावध राहावे, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. या सदनिका आणि भूखंडांच्या विक्रीसाठी त्यांनी कोणताही प्रतिनिधी, सल्लागार आणि मालमत्ता एजंट नेमलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.