
म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा (MHADA Direct Recruitment Exam) 12 डिसेंबरला आयत्या वेळेस रद्द करण्यात आल्याने अनेकांचा संताप अनावर झाला होता पण आता ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. म्हाडा कडून सरळसेवा भरती परीक्षा 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. अद्याप सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आले नसले तरीही फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा होणार असून ती ऑनलाईन माध्यमातून घेतली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
म्हाडाची सरळसेवा भरती परीक्षा आता TCS कडून घेतली जाणार असल्याचेही म्हाडाने जाहीर केले आहे. यापूर्वी म्हाडाची परीक्षा 12 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार होती पण प्रश्नपत्रिका फुटल्याने संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पण विद्यार्थ्यांसाठी आता या परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.
महाराष्ट्रात सध्या म्हाडा परीक्षा आणि टीईटी परीक्षांबाबत झालेल्या गैरव्यवहारांचे प्रकरण चर्चेमध्ये आहे. पुणे पोलिसांनी यामध्ये 5 जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, बंगळुरुमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखांचाही समावेश आहे. म्हाडा परीक्षेचं कंत्राट 2017 पासून जीए टेक्नॉलॉजी कडे होती. 11 डिसेंबरला रात्री उशिरा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द झाल्याचं जाहीर केल्याने विद्यार्थांनी आपला संताप व्यक्त केला होता.
म्हाडा कडून इंजिनियर, क्लार्क आणि अन्य पदांवर 265 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. नेमकी कोणती परीक्षा कधी होईल याची माहिती काहि दिवसांत जारी केली जाईल त्यासाठी विद्यार्थ्यांना mhadarecruitment.in या अधिकृत वेबसाईटला लक्ष ठेवावं लागणार आहे.