प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: File Photo)

Pune Shivaji Market Fire: पुणे शहरातील कॅम्प भागातील शिवाजी मार्केटमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मटण आणि चिकनचे 25 दुकाने जळून खाक झाले आहेत. शिवाजी मार्केटमध्ये आग लागल्याची घटना समजताचं अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवता आले. अचानक आग लागल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. व्यापारी संघटनेने अंदाजे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे.

लष्कर पोलिस स्टेशन आणि पुणे अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सकाळी 3.च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर 6.30 वाजेपर्यंत अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. (वाचा - Pune Fire: पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग)

शिवाजी मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मंजूर शेख यांनी सांगितलं की, मला सकाळी 3.50 वाजता आबिद शेख यांचा फोन आला. त्यांनी मला शिवाजी मार्केटला भीषण आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर मी तात्काळ अग्निशमन दलाचे कार्यालय, पोलिस आणि पुणे छावणी मंडळाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली.

मंजूर शेख यांनी पुढे सांगितलं की, मी अवघ्या पाच मिनिटातचं घटनास्थळी पोहोचलो. यावेळी माझे मटण आणि चिकनचे दुकानं पूर्णपणे जळून खाक झाले होते. या आगीत एकूण 17 मासे व 8 चिकनची दुकाने पूर्णपणे नष्ट झाले. या घटनेमुळे मार्केटचं सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.