Nalasopara Suicide: खळबळजनक! लग्नाला 2 वर्षही झाले नाहीत अन् एका दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या; नालासोपारा येथील घटना
Representational Image (Photo Credits: Pixabay)

लग्नाला 2 वर्षही झाले नाहीत अन् एका दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील (Nalasopara East) एव्हरशाईन सिटीमध्ये (Evershine City) शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती होताच तुळींज पोलिसांनी (Tulinj Police Station) घटनास्थळी जाऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहे. तसेच पैशांच्या चणचणीमुळे या दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी तुळींज पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

राहुल धना चव्हाण (28), ज्योती राहुल चव्हाण, असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. राहुल आणि ज्योती यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. राहुल हा मेट्रोमध्ये गार्डची नोकरी करायचा. परंतु, त्याला मिळाणाऱ्या पगारात घरखर्च भागत नसल्याने दोघांत सतत वाद होत असे, अशी माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे घर आतून बंद असून लाईट पेटली नसल्याचे पाहताच शेजारी राहणाऱ्या एका महिलेने त्यांना बाहेरून आवाज दिला. परंतु, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांना वेगळाच संशय आला आणि त्यांनी चव्हाण दाम्पत्याच्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी राहुल आणि ज्योती या दोघांनी घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळले. त्यानंतर शेजाऱ्यांनी तुळींज पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती होताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. हे देखील वाचा- Pune Murder: पुणे हादरले! रागाने बघितले म्हणून एका तरूणाची हत्या; 5 जणांवर गुन्हा दाखल

या घटनेच्या काही दिवसापूर्वीच नालासोपाराच्या वसई पूर्वेकडली भोयदापाडा येथे राहणाऱ्या दाम्पत्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. कृष्णा पटेल (वय, 32) आणि प्रभाती पटेल (वय, 30) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याची नावे आहेत. या दोघांना 2 वर्षांचा मुलगा असल्याचे कळत याप्रकरणी वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.