Subhash Desai (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर खानापूर तालुक्यात एका मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, या दोन राज्यांमधील सीमावादाचा फटका नुकताच साहित्यिकांनाही बसला आहे. कर्नाटकातील खानापूर तालुक्यात असलेल्या इदलहोड येथे होणार असलेल्या गुंफन मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्या मराठी साहित्यिकांना खुद्द पोलिसांनीच प्रवेश नाकारला आहे. तसेच मराठी साहित्यिकांना गावबंदी घालण्यात आली आहे. यासर्वामुळे मराठी साहित्यिकांमध्ये संतप्त भावना पसरली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या बंदीला कडकडून विरोध केला आहे. त्यासंदर्भात सुभाष देसाई यांनी ट्विट लिहीत निषेध केला. ते लिहितात, “मराठी साहित्यिकांना कर्नाटकमधील एका मराठी साहित्य संमेलनासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांना कर्नाटक पोलिसांनी पोलिसांनी बेळगावमध्येच रोखले. महाराष्ट्र सरकारचा मराठी भाषा खात्याचा मंत्री या नात्याने कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो,” असं देसाई यांनी म्हटलं आहे.

धक्कादायक! मराठी साहित्य संमेलनात चहाच्या स्टॉल्सवर पायरेटेड पुस्तकांची विक्री

दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील सीमावादाचा मुद्दा अनेक वर्षांपासून उसळत आहे. तसेच हा मुद्दा पुन्हा गाजला जेव्हा कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याची वक्तव्य केले होते, ज्यामुळे अलीकडेच दोन्ही राज्यांच्या सीमाभागात हिंसाचारही भडकला होता. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या बसेस फोडण्यात आल्या होत्या.