Marathi Language University: मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त हे विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. हे विद्यापीठ मराठी भाषिकांच्या आकांक्षा पूर्ण करेल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या जागेत आणि ग्रंथालीच्या पुढाकाराने हे मराठी भाषा विद्यापीठ उभारलं जाणार आहे. हे विद्यापीठ वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुरू व्हावं, अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली होती. (वाचा - MPSC 2020 पूर्वपरीक्षा अचानक रद्द झाल्याने पुण्यात विद्यार्थी आक्रमक; आमदार रोहित पवार, सत्यजित तांबे यांच्यासह अनेकांची कोरोना प्रतिबंधक नियम पाळत परीक्षा घेण्याची सरकारकडे मागणी)
सुभाष देसाई ट्विट -
महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त हे विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून हे विद्यापीठ मराठी भाषिकांच्या आकांक्षा पूर्ण करेल, असा विश्वास आहे.
— Subhash Desai (@Subhash_Desai) March 11, 2021
दरम्यान, वांद्र्यातील येथील बँडस्टँड येथील जागा मुंबई महापालिकेने मराठी भाषा विद्यापीठाला देण्याची तयारी दाखवली आहे. राज्यात मराठी विद्यापीठ स्थापन करावं, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेकदा करण्यात आली आहे. या विद्यापीठात मराठी भाषेतील सर्व ग्रंथ आणि पुस्तक ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय मराठी भाषेच्या संवर्धन व प्रचारासाठी या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.