राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु आहे. आरक्षणासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांवर हल्ले किंवा बहिष्कार टाकण्याच्या घटना या घडत आहे. साताऱ्यातील मांढरदेवी गडावर (Satara Mandhardevi Temple) आता राजकारण्यांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आता मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शन घेता येणार नाही. मंदिराबरोबर गावात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. (हेही वाचा -Maratha Reservation: 'पाणी प्या पाटील.. तुम्हाला समाजाचं ऐकवं लगेल'; समाजाच्या आर्त हाकेनंतर मनोज जरांगे यांच्याकडून पाच घोट प्राशन)

साताऱ्यातील मांढरदेवी गावात आता राजकारण्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शनासही बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजातील अंदोलकांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मांढरदेवी ग्रामपंचायतीनेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिले जाणार नसल्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.