Manoj Jarange Newsछ मराठा आरक्षण मुद्द्यावर आक्रमक झालेल्या आणि उपोषणास बसलेल्या मोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. उपोषणाला बसल्यापासून त्यांच्या शरीरात अन्नाचा आणि पाण्याचा कणही गेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर ढासळत आहे. त्यामुळे त्यांनी हा लढा पुढे सुरु ठेवावा मात्र, आपल्या प्रकृतीकडेही लक्ष द्यायला हवे, असे अवाहन सर्व स्तरातून होऊ लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज (30 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत असेच अवाहन केले होते. दरम्यान, उपोषणस्थळी मराठी समाज मोठ्या संख्येने जमला आहे. सर्व समाज आणि उपस्थित आंदोलकांकडून जरांगे यांना अवाहन केले जात आहे की, 'पाटील तुम्ही पाणी प्या.. समाज तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्हाला समाजाचे ऐकावे लागेल. तुम्ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहात. तुम्हाला पाणी प्यावे लागेल'.
समाजाने केलेल्या अवाहनावर मनोज जरांगे यांनी म्हटले की, 'माझी काळजी करु नका. मी जर पाणी पिलो तर समाजाला आरक्षण कसं मिळणार? मी पाणी पिणार नाही.' त्यावर समाजाकडून पुन्हाएकदा जोरदार विनंती करण्यात आली. त्यावर समाजाचा मान म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पाच घोट पाणी पिण्याचे मान्य केले. मात्र, मी केवळ तुमची विनंती ऐकून पाणी पितो आहे. जरांगे यांचे हे विधान ऐकताच उपस्थतांमध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. उपस्थित आंदोलकांनी जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला. त्यानंतर जरांगे यांनी केवळ पाच घोट पाणी प्राशन केले.
दरम्यान, आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांचे घर जाळल्याबाबत विचारले असता जरांगे यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली. मला खात्री आहे. मराठे असे काही करणार नाहीत. पण त्यांनी असे केले आहे याचा अर्थ सोळंके यांनीच काही तरी खोड केली असेल. त्याला फार कंड आहे. नाहीतर मराठे असे कोणाच्या वाटेला जाणार नाहीत. जोपर्यंत कोणी मराठ्यांच्या वाट्याला जात नाही. तोवर मराठेही कोणाच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे असे काही घडले असेल तर त्याला तेच जबाबदार असतील, असे जरंगे म्हणाले. दरम्यान, तिथे काही घर वगैरे जाळण्याचा प्रयत्न झाला असेला तरी तो कोणी केला याची पोलिसांनी माहिती घ्यावी. अन्यथा उगाचच तिथे मराठा पोरांना त्रास द्यायला गेलात तर खबरदार. मी इथून सगळे आग्या मोहोळ घेऊन तिथे येईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.