मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे. तसेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे या सरकारचे अपयश आहे, असे विधान विरोधीपक्षातील नेते वारंवार करत आहेत. यातच भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी आरक्षणाबाबत मोठ विधान करून सर्वांचे लक्ष केंद्रीत केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर, सगळ्याचे आरक्षण रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच गुणवत्तेनुसार मेरिवर सर्वांची निवड करा, असेही त्यांनी म्हटले आहे.
"मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अनेक समाजाला आरक्षण मिळाले आहे. यामुळे मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही प्रवेश मिळत नाही. मात्र, इतर समाजातील विद्यार्थ्यांना कमी गुण मिळूनही प्रवेश मिळतो. प्रवेश न मिळाल्याने मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत. आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर, सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा," असे उदयनराजे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Sanjay Raut and Devendra Fadnavis Meeting: संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही; देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
याआधीही उदयनराजे यांनी सर्व आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण द्या, अशी मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करत आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटनांच्या वतीने येत्या 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.